Date :21/04/2023
Guest Speaker :ShriKurpesh More (District Judge, Nagpur)
Topic : “Death Penalty in India – A Critical Insight”
अवयवदानाने बंदीवानाचे पापाचे पुण्यात रूपांतर शक्य…
‘फाशीची शिक्षा झालेल्या बंदीवानांनाही अवयवदानाचा घटनात्मक अधिकार’ विषयावर चर्चासत्र संपन्न.
आयुष्यात केलेल्या मोजता न येणाऱ्या पापांनंतर माणसाला शेवटच्या क्षणाला का होईना सुधारण्यासाठी एक संधी मिळते हीच संधी अवयवदानाने फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना उपलब्ध झाली असून त्याद्वारे ते पापा कडून पुण्याकडे जाऊ शकतात असे प्रतिपादन नागपूर येथील जिल्हा न्यायाधीश कृपेश मोरे यांनी केले.
त्रिमुर्ती चौक येथील शिवशक्ती नगर परिसरातील नवजीवन विधी महाविद्यालयात शुक्रवारी (दि.21) रोजी आयोजित ‘ फाशीची शिक्षा झालेल्या बंदीवानांनाही अवयवदानाचा घटनात्मक अधिकार ‘ या विषयावर चर्चासत्रात मोरे बोलत होते. यावेळी त्यांनी कायद्याचे अनेक रूप उलगडत नवतरुणांना एक्स्पर्ट मेडीएटर म्हणून वकिली क्षेत्रात चांगले दिवस असून चांगले मेडीएटर झाल्यास न्यायाधीश पर्यंत संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे मेडीएशन मध्ये तारीख पे तारीख नसते त्यामुळे पुरावेही कमी लागतात व केस लवकर निकाली निघण्यास मदत होते.
कैद्याला झालेली फाशीची शिक्षा त्याने नेमकी कशी भोगावी याबाबत तरतूद नाही परंतु जर गुन्हेगाराने ठरविले तर तो शेवटच्या क्षणीही आपले समाजाला खून, दरोडे, गुन्हे यांव्यतिरिक्त काहीतरी चांगले देऊ शकतो ते म्हणजे आपले अवयव दान !
अवयव दान करून गुन्हेगार आपली प्रतिमा सुधारू शकतो. गन्हेगारांचे अवयव दान हे चुकीचे आहे यात आज मितीस तरी कुठलेही तथ्य नाही. त्यामुळे कुठलेही अवयव दान करून एखाद्याचा जीव बंदिवानाला वाचविता येतो. सुदृढ व्यक्तीच्या अवयव दानाने किमान आठ ते नऊ गरजू लोकांना जीवनदान मिळू शकते असेही मोरे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ शाहीस्ता सलीमखान इनामदार, विजय काळे, सोमनाथ चौधरी, अनिल शेळके, महेंद्र विंचूरकर, मकरंद पांडे, डॉ.समीर चव्हाण, डॉ.शालिनी घुमरे, मंगल पाटील, उल्का चव्हाण, मीनाक्षी जाधव, अतुल उंबरकर, अलका लोखंडे,आदी उपस्थित होते.
प्रास्तविक डॉ.शाहीस्ता इनामदार यांनी तर आभार स्नेहा धात्रक, श्रद्धा ठाकूर यांनी मानले. कार्यक्रमास नवजीवन विधी महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.